भंडारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा पोलीस दलात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मंजुर पदांपैकी अधिकारी व कर्मचारी यांची एकूण ११९ पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यावर अजुनपर्यंत तोडगा न निघाल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
जिल्हा पोलीस दलात आस्थापनावरील पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या पदाअंतर्गत जवळपास ६० पदे रिक्त आहेत. पोलीस उपअधीक्षकांची मंजुर पदे सहा असून त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत. यापैकी बदली अंतर्गत एक पद रिक्त असल्याने याची संख्या चार एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १७ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस निरीक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. सहायक पोलीस निरीक्षकांची ३५ पदे मंजुर असून त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त रिक्त पदे पोलीस उपनिरीक्षकांच्या आहेत. यात ६९ पदे मंजुर असताना प्रत्येक्षात मात्र ३७ पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावर आहेत. प्रत्यक्षरित्या ३२ पदे रिक्त असून संभाव्यस्थितीत ३० पदांवर अधिकार नेमणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बिनतारी संदेश वहन अंतर्गत पोलीस निरीक्षकाचे एक पद, पोलीस निरीक्षकाचे एक पद, नागरी हक्क सुरक्षा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षकाचे एक पद, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षकांचीतीन पदे तर मोटर परिवहन विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षकाचे एक पद रिक्त आहे.

बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी नाही
पोलीस दलात बॉम्ब शोधक नाशक पथक कार्यरत आहे. याअंतर्गत जिल्हा पातळीवर पोलीस उपनिरीक्षक पदा अंतर्गत दोन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परंतु ही दोन्ही पदे रिक्त असल्याने आपातकालीन स्थितीत परजिल्ह्यातून बॉम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना बोलाविण्याची नामुष्की जिल्हा पोलीस प्रशासनावर येवू शकते. परिणामी सदर दोन्ही पदे भरणे आवश्यक आहे.
कर्मचाºयांची ५९ पदे रिक्त
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाईपर्यंतची एकूण ५९ पदे रिक्त आहेत. यात सहायक पोलीस उपनिरीक्षकांची ११६ पदे मंजुर असून चार पद रिक्त आहेत. पोलीस हवालदारांची सहा तर पोलीस नाईक पदाची सात पदे रिक्त आहेत. पोलीस शिपाईची ४२ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण १५६४ पोलीस कर्मचारी असून त्यापैकी १५०५ कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

सद्यस्थितीत कामाचा ताण वाढला आहे. अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मोठी कसरत करावी लागते. शासनस्तरावर रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours