मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे रात्री ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण या विषयावर त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना भेटीची वेळ दिली होती. मराठा आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपण स्वतः या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे जाहिर केले होते. आरक्षण या विषयावर नारायण राणे यांचा गाढा अभ्यास असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राणेंना चर्चेसाठी वेळ दिला असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री चर्चेला तयार
गेल्या तीन दिवसांपासून मराठा पेटलेल्या मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतू उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तथापि यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी मागासवर्ग आयोग राज्य सरकारने गठीत केला. त्यामाध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारीत ज्या काही बाबी आहेत, त्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
राज्यभरात मराठा आंदोलनाचा वनवा पेटला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours