मुख्य सपादीकी. सुनिता परदेशी
भंडारा : जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.
जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात धानाची (भात पिकाची) लागवड केली जाते. मृग नक्षत्राची चाहूल लागताच बळीराजा शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ करत असतो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस बरसताच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार पेरणी आटोपली होती. परिणामी पाऊस बरसल्यानंतर पऱ्हे रोवणीच्या अवस्थेपर्यंत आल्यामुळे रोवणीच्या कामालाही प्रारंभ केला होता. मध्यंतरी मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. सिंचन सुविधा असलेल्यांना दिलासा मिळाला असला तरी निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले.
दुबार पेरणीनंतरही जवळपास दोन दिवस पाऊस न बरसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र रविवार मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे रोवणीच्या कामाला पून्हा दमदार सुरुवात झाली.
गत २४ तासात जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. यात भंडारा, मोहाडी, पवनी, साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तालुकानिहाय आकडेवारीअंतर्गत भंडारा तालुक्यात ९१.६ मिमी, मोहाडी ११५.४ मिमी, तुमसर २३.२, पवनी ७७.६, साकोली ९४, लाखांदूर ८५.२ तर लाखनी तालुक्यात ७९.६ मिमी पाऊस बरसला. या सर्वांची सरासरी ८०.९ मिमी इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी उत्तम आहे.
दरम्यान जिल्ह्यात संततधार पावसामुळे काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे तर काही ठिकाणी मातीच्या घरांची पडझड झाल्याचे वृत्त असले तरी नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पालांदूर : पालांदूरसह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारला त्याची १३३.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासाच्या हजेरी धानाचे बांदाण धानासहीत पाण्याखाली आले आहेत. नदी नाले किनारी गावकºयांना पोलीस व महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अख्ख्या विदर्भात पावसाची संततधार सुरु असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.
प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भंडारा : भंडारा जिल्ह्यात १६ व १७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यानियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले. नागरिकांनी शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. पाणी असेल तेथून वाहन घेऊन जाण्यास टाळावे. पूर असताना नदी, नाला ओलांडू नये. पुलावरून पूराचे पाणी वाहत असताना दुचाकी, चार चाकी वाहने नेऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours