22 जुलै : आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आता पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. ठिकठिकाणी मोर्चाला हिसंक वळण लागताना दिसलं. मंगळवेढयातून येत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजी केली. सहकारमंत्र्यांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आंदोलक मात्र आक्रमक होते. त्यांनी बराच वेळ सुभाष देशमुख यांचा ताफा अडवून धरला होता.
एकीकडे आक्रमक झालेल्या मराठा मोर्चाने पंढरपूरमध्ये एसटी बस फोडली आहे. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर ही बसची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे परळीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अजूनही सुरूच असून काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून लेखी आश्वासन येऊन सुध्दा हे आंदोलन सुरूच आहे.
आंदोलकांच्या मागणीवरून काल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मराठा आरक्षणाबाबत लेखी खुलासा करण्यात आला असून 72 हजार नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात सांगितले तेच या आंदोलकांना लेखी कळविले आहे. परंतु या आंदोलकांनी मात्र आरक्षणाचा विषय जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत कुठलीच भरती करायची नाही अशी ठोस भुमिका घेतलीय.
दरम्यान काल रात्री शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या आंदोलकांना भेट दिली. या वेळी आंदोलकांशी संवाद साधताना शासनाची भूमिका मांडली परंतु ते आंदोलकांना न पटल्याने त्यांनी मेटेंना बोलू दिले नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours