तुमसर : रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना दिसत नाही. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. सदर रस्ता मोठा वर्दळीचा आहे.
गत २४ तासात तुमसर तालुक्यात संततधार सुरु आहे. तुडका, तामसवाडी शिवारात एक रपटा तुडूंब भरून वाहत आहे. रामटेक गोंदिया राज्यमार्ग मोठा वर्दळीचा असून जड वाहने व लहान वाहनाचा पाण्याच्या प्रवाहातून वाहतूक करणे सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्यामुळे एकच दिसत आहे. पाण्याचा प्रवाहाची गती जास्त आहे. दुचाकीस्वारांचा जीव येथे धोक्यात आहे.
रपट्यला सुरक्षा कठडे नाही. त्यामुळे रस्ता कुठे आहे. याचा अंदाज येत नाही. रपट्याच्या पुढे वळण आहे. त्यामुळे नेमक्या रस्त्याचा अंदाज येथे चुकतो. रात्रीला वाहनधारकांना येथे बराच वेळ थांबावे लागते. स्थानिकांना विचारल्यावरच वाहनधार येथून पुढे जातात. प्रथमदर्शनी हा मोठा नाला तर नाही ना असा प्रश्न पडतो. बाजूला शेतशिवारात पाणीच पाणी असल्याने वाहनधारक येथे थांबतात. सोमवारी रात्री अनेक वाहने येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यावर पुल बांधकाम करण्याची गरज आहे. किमान रपट्यावर सुरक्षेकरिता कठडे तयार करणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
सुरक्षित प्रवासाची हमी सार्वजनिक बांधकाम विभाग देतो. परंतु येथे तो विसर पडलेला दिसत आहे. रात्री येथे किमान चौकीदार ठेवण्याची गरज आहे. महत्वपूर्ण रस्त्याचा येथे संबंधित विभागाला विसर पडलेला दिसत आहे. विभागाचे कार्यालय येथून केवळ तीन कि.मी. अंतरावर आहे हे विशेष. इतर रस्त्याची काय काळजी घेत असतील हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ता सुरक्षिततेची हमी शासन घेते. येथे रामटेक गोंदिया महत्वपूर्ण रस्ता पाण्याखाली आला आहे. रपट्याचे पुलात रुपांतर बांधकाम विभागाने का केले नाही. अपघाताला संबंधित विभागालाच जबाबदार ठरवावे लागेल.
Post A Comment:
0 comments so far,add yours