मुंबई, 17 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दुध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत या दूध आंदोलनाचं लोण सध्या पहायला मिळतंय. मुंबईला होणारा दूध पुरवठा तोडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून सुरू आहे.
राज्यभरातून मुंबईत येणारे दूधाचे टँकर आंदोलकांनी रोखून धरलेत. या आधीच दुध आंदोलनावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच जुंपलीय. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनातही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

मुंबईत आणखी तीन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा आहे. त्यामुळं तातडीनं नसलं तरी आणखी दोन दिवसांपासून दुधाचा तुटवडा निर्माण होऊ शकेल. त्यामुळं मुंबईकरांना दूध टंचाईला सामोरं जावं लागू शकते.

दूध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यात दुध आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालंय. पहाटे पुण्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी गोकुळ दुधाच्या गाडीवर दगडफेक केलीय. तर दुसरीकडे पिंपरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमूल दुधाचा ट्रक आढवला. त्यानंतर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी केलीय.

कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शिरोळ तहसीलदारांच्या गाडीवर दूध ओतलं. शिरोळ तालुक्यातील दुध आंदोलनासंदर्भात आढावा घेत असताना तहसीलदारांच्या गाडीवर हे दुध ओतण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours