रिपोर्टर- हर्षीता ठवकर

भंडारा : जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून जनजीवन प्रभावित झाले आहे. सहा मार्गांशी संपर्क तुटला असून राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाची ३३ पैकी ३१ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली आहे. मागील २४ तासात सरासरी २७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भंडारा शहरातही रविवार रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत कायम होता. त्यानंतर काही काळ पावसाने उसंत दिल्याने रस्त्यावर रहदारी दिसून आली.
पावसाची दमदार हजेरी
वरठी : अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली. ग्राम पंचायतीच्या पावसाळा पूर्व नियोजनामुळे पाहिजे त्या त्याप्रमाणात फटका बसला नाही. संततधार पावसाचा फटका नागरिकांना बसला असून आज दिवसभर जनजीवन विस्कळीत झाल्याचे निदर्शनास आले. गावातील अनेक भागातील रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत होते. गावातील अनेक भागातील घरात पाणी शिरले होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होऊन अनेक भागाचा संपर्क तात्पुरता तुटलेला होता. पावसाच्या दमदार सुरुवातीला अनेक भागातील नाल्या ओसंडून वाहत होत्या. वस्तीतील अनेक खुल्या भागात पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. सुभाष वार्ड येथील नाल्या शेजारी असलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या भागातील खुल्या जागेत पाणी जमा झाल्याने ठीक ठिकाणी रस्ते जाम होऊन पाणी ओसंडून वाहत होते. तीन तास या रस्त्यावरून रहदारी बंद होती.
पाचगाव फाट्यावर असलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने अनेक घराचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर असलेल्या वेल्डिंग दुकानासमोर नालीचा काही भाग वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. एस टी स्टँड जवळ असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नवप्रभात हायस्कूलच्या पटांगणात पाणी साचल्याने विध्यार्थ्यांना कमालीचा त्रास झाला. वरठी येथील अनेक भागात सारखी परिस्थिती होती. पावसाच्या पाण्याने होणारा त्रास लक्षात घेऊन सरपंच श्वेता येळणे या स्वत: भरपावसात फिरताना दिसल्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या. अनेक ठिकाणी त्यांना रोषाला समोर जावे लागले. पण पावसाळा पूर्व नियोजन करून गावातील नाल्या व मोठे नहर स्वच्छता मोहीम सोबत नाला खोलीकरण करण्यात आल्याने समस्या कमी प्रमाणात जाणवल्या.
दमदार पावसाने रोवणीला प्रारंभ
करडी (पालोरा) : परिसरात काल सायंकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली. १८ तास रिमझिम व जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली. तलाव, नाल्यांत पाणी साठा वाढला. काही कृषी बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. सिंचनाची सुविधा असणाºया शेतकºयांनी केलेली रोवणी पाण्यात बुडाली तर खोलगट भागातील पºहे शेतात सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणखी काही तास पाऊस सुरूच राहिल्यास खमारी व सुरेवाडा नाल्यावरील पुलावर पाणी येवून वाहतूक खोळंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून रोवणीच्या लगबगीला लागला आहे. रोवणीसाठी मजूर बोलविण्यास धावपळ करताना शेतकरी दिसून आले.
लाखनी तालुक्यात मुसळधार पाऊस
लाखनी : तालुक्यात आज सकाळपासून पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिवसभर संध्याकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. सकाळी ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत लाखनी, मुरमाडी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. कालपासून पडलेल्या पावसाने धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. बांद्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रोवणी कामाला वेग आला आहे. गावातील महिला व पुरूष मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. ३०० रूपये रोजी महिला कामगाराला एका दिवसासाठी मिळत आहे. लाखनी येथे १२.२ मि.मी. पाऊस, पिंपळगाव सडक ५२.२ मि.मी., पोहरा २३.२, पालांदूर १८ मि.मी. असा एकूण तालुक्यात २६.४ मि.मी. पाऊस पडला आहे. नाले, ओढे, बोडी, तलावात पाणी साचू लागले आहे.
पहाटेपासूनच धो-धो पाऊस
पालांदूर : सोमवारच्या पहाटेपासूनच पालांदूर परिसरात दमदार हजेरी लावीत नदी-नाले दुथडी भरले. तीन-चार दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पुनरागमन करीत रोवणीला हातभार लागला. हवामान खात्याचा अंदाज अगदी खरा ठरला. सोमवारच्या दुपारी २ वाजेपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जायला पावसाचा अडथळा सहन करावा लागला. दुपार पाळीच्या शाळेत अल्प प्रमाणात विद्यार्थी पोहचले. शाळेत उपस्थिती अतल्प असल्याने शाळेला लवकरच सुट्टी देण्यात आली. रोवणी करीता महिला मजुर गेली पण पावसाचा संततधार पाण्याने लवकरच परत आले. माहेगाव नाला दुथडी भरून वाहत आहे. नदीला पण पाणी आल्याने या पावसाळ्यात प्रथमच नदी नाले दुथळी वाहत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours