अकोला: गेल्या 16 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेले वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे रविवारी रात्री पोलीस तपासात समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणण्यात आला व पुरामध्ये फेकून देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. मारेकऱ्यांनी या हत्याकांडाची कबुली दिली असली तरी, आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप साडला नसल्याने आरोपींची नाव सांगण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत.
मारेकऱ्यांनी भारीपचे नेते आसिफ खान यांची निर्घृण हत्या करून मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह गवसला नसल्याने पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. आसिफ खान यांना गुरुवारी १६ ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली. पोलिसांना या कारमधून संशयास्पद पुरावे हाती लागले होते. काही लोकांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस रात्री उशिरा आरोपीला घेऊन घटनास्थळावर गेले होते. ज्या ठिकाणी आसिफ खान यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला, ती जागा आरोपींनी पोलिसांना दाखवली. खून करण्याची पद्धत, खून कोणी केला, विल्हेवाट कशी लावली, कोणत्या कारणासाठी आरोपींनी हे कृत्य केलं त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कसून चौकशी करीत आहे. आरोपींनी जरी खूनाची कबुली दिली असली तरी, आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप गवसला नसल्याने आरोपींचे नाव सांगण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours