पुणे : शिरूर तालुक्यातील सणसवाडीतल्या एका एका कंपनीच्या सुपरवायझरने कामगाराचा चाकूने खून केला. प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले. ही घटना आज (दि.२० ऑगस्ट) सकाळी घडली. याप्रकरणी सणसवाडीचे अमित अभिमन्यू जाधव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्रापूर पोलिसांनी सुपरवायजर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी ता. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दामोदर कृष्णा जबल (रा. सणसवाडी ता. शिरूर मूळ रा. धारावी, मुंबई) असे खून करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करणारा जबल व सुपरवायझर राठोड यांच्यात दोन दिवसापूर्वीच एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून भांडणे झाली होती. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी लेबर कॉन्ट्रॅक्टर अमित जाधव यांनी त्या दोघांना बोलावले होते. मात्र, सोमवारी सकाळीच कंपनी सुपरवायझर संतोष राठोड याने रागाच्या भरात सणसवाडी येथील संचेती कंपनीजवळ जबल याची चाकूने भोसकून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु ,उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी फरार आरोपी संतोष राठोड याचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours