मुंबई: मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर औरंगाबादमध्ये वाळूज एमआयडीसीमध्ये तीन कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. तसंच कंटनेरही पेटवून देण्यात आला. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी हवेत गोळीबार करावा लागला.  एकीकडे मराठा समन्यव समितीने आंदोलन शांततेत पार पाडावे अशी भूमिका घेतली पण दुसरीकडे ठिकठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करून महाराष्ट्र बंदला गालबोट लावण्यात आलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गानं राज्यव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं.  त्या आवाहनाला साद देत आज सकाळी राज्यभरात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला. घोषणाबाजी सोडली तर सुरूवातीला आंदोलन ठरल्याप्रमाणे शांततेत सुरू होतं. मात्र दुपारनंतर आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळालं.  हिंसक आंदोलनाचा सर्वात मोठा फटका पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरला बसला. एक्सप्रेसवेसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.  औरंगाबाद-नागपूरमध्ये रेलरोको करण्यात आला. हिंगोली लातूरमध्ये जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी पत्रकार आणि आमदारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याच्या निर्धारानं पुकारण्यात आलेल्या बंदला या घटनांमुळं गालबोट लागल्याचं दिसतंय.
काँग्रेस आमदारांच्या गाडीवर दगडफेक
घडाळ्याच्या काटा जसजसा पुढे सरकू लागला तसंतसं मराठा आंदोलन तापत गेलं आणि शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी गालबोट लागलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. तिकडे लातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागलं. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचप्रमाणे औरंगाबादेतही वाळूंज एमआयडीसीत आंदोलकांनी टँकर फोडला. नांदेडमध्ये उमरी स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानं रेल्वेचं मोठं नुकसान झालं.. तसंच नाशकातही आंदोलकांच्या 2 गटांमध्ये हमरीतुमरी झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. सर्व आंदोलक जवळपास 18 ते 19 वयोगटातील होते. भिंतीवर चढून आंदोलकांनी दिवे फोडले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours