मुंबई, २४ ऑगस्ट- मुंबई मनपाच्या रुग्णालयांमध्ये फक्त डॉक्टरच नाहीत तर सफाई कर्मचारीही पोस्टमार्टम करत असल्याचा धक्कादायक आरोप करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. आदिल खत्री यांनी ही याचिका दाखल केली. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे आरटीआय अंतर्गत मनपानं हा प्रकार होत असल्याचं मान्य केलं आहे.
मुंबई हायकोर्टानं या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंबई मनपाला नोटीस बजावत चार आठवड्यात उत्तर द्यावे, असे निर्देश दिले आहेत. गेल्या वर्षी सायनच्या मनपा रुग्णालयात खत्री गेले असता, त्यांना हा प्रकार दिसला असा त्यांचा दावा आहे. अनेकदा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असताना डॉक्टरांना शवागारसेवक, सहाय्यक डॉक्टर आणि सफाई कामगारांकडून सहाय्य केलं जातं असं उत्तर खत्री यांना मिळालं.
पोस्ट मार्टमसाठी केवळ प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात यावी, यासंदर्भात सर्व पालिका रुग्णालयांत नियमाप्रमाणे प्रक्रिया पार पाडण्यात यावी आणि विशेषत: महिलांच्या शवांचं विच्छेदन करण्यासाठी केवळ महिला डॉक्टर आणि सहायकांना परवानगी देण्यात यावी, असे निर्देश महापालिका आणि राज्य सरकारला देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours