अमरावती, 09 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात मालखेड येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मालखेड रेल्वे येथील रूपेश बाळकृष्ण फुसे (३२) आणि आई शशिकला बाळकृष्ण फुसे (७०) असे या आई-मुलाचे नाव आहे. या मायलेकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या दोघांनी राहत्या घरीच काल सायंकाळच्या दरम्यान गळफास लावुन आत्महत्या केली. रूपेश फुसे हा मुंबई येथे विद्युत मंडळात नोकरीवर होता. तो त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन दिवसांपुर्वी मालखेड येथे आला होता. रूपेश विवाहीत असुन त्याला एक मुलगासुद्धा आहे. तो परिवारासह मुंबईला वसई येथे राहत होता.
आपल्या मागे आपलं कुटुंब आहे याचा जरासाही विचार न करता रुपेश आणि त्याच्या आईने आत्महत्या केली. दरम्यान, या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी रुपेश आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
या आई-मुलाच्या आत्महत्येचं गुढ उकलण्यासाठी पोलीस आता स्थानिकांची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर ते फुसे कुटुंबियांचीही चौकशी करणार आहेत. पण दरम्यान, या दोघांच्या अशा जाण्याचे परिसरातून हळहळ व्यक्त होतेय.
Post A Comment:
0 comments so far,add yours