मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करण्यासाठी काँग्रेसचे नेते एकवटले आहेत. तर काही नाराज नेत्यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन निरूपम यांना हटवण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबई काँग्रेसमध्ये गृहयुद्धाला सुरूवात झली असून, पुन्हा गटबाजीला उधाण आलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपमांची उचलबांगडी करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक एकवटलेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट निरूपम यांना हटवण्याची मागणी करण्यात आल्याचं समजतंय. या शिष्टमंडळात नसीम खान, सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप आणि कामत गटातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निरूपम यांच्या 'एकला चलो रे..'च्या भूमिकेमुळे मुंबई काँग्रेसमधल्या इतर नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कृपाशंकर सिंह यांची भाजपशी जवळीक, प्रिया दत्त, मिलिंद देवरा यांचा निरूपम यांना असलेला विरोध या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक चर्चेचा विषय ठरलीय. ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस पक्षात निरूपम यांच्या विरोधात सुरू झालेली ही धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस प्रभारी खरगे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वास्तविक निरूपम यांना राहुल गांधी यांचा पाठिंबा जास्त आहे, त्यामुळे यापूर्वी विरोध असूनही निरूपम यांवर कारवाई झालेली नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours