मुंबई, 13 ऑक्टोबर : 'संत तुकारामांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे म्हणातात ना तसे. तिच्या तोंडातून नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. ' संभाजी महाराजांची बदनामी करणारा मजकूर सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छापल्याची घटना ताजी असतानाच आता संत तुकाराम यांचीही बदनामी करणारा मजकूरदेखील पुस्तकात आढळून आला आहे.
'संतांचे जीवन प्रसंग' या गोविंद गोपीनाथ तळवलकर लिखित पुस्तकात संत तुकाराम यांचा अवमान केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे.
महाराष्ट्राच्या पूज्यनिय लोकांची बदनामी करण्याचं धोरण शिक्षण विभागाचं असल्याचा आरोप करत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केलीय.
संत तुकाराम महाराजांची पण बदनामी...!
"संत तुकारामांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे म्हणातात ना तसे. तिच्या तोंडातून नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. 'ते आमचं येडं' असे आपल्या पतीला ती म्हणायची! पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि माहादू त्यांची मुले. या दोघांची जेवणे झाली. आई, तू नाही जेवत? त्यांनी विचारले."
दरम्यान, शिक्षण विभागाने महापुरूषांची विटंबना लावली आहे. हा बदनामीचा कहर आहे. शिक्षण विभाग आहे का भंगार ? शिक्षण विभाग जाळला पाहिजे...! कारण हे विनोद तावडेंचे पाप आहे अशी संतत्प प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडनं व्यक्त केली आहे.
तर सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा आरोपही होतोय. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या नेऊन अनोखं आंदोलन केलं.
'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात हा आक्षेपार्ह मजकूर आहे. 'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते, अष्टप्रधान मंडळातल्या थोर मंडळींची संभाजी महाराजांनी न भूतो न भविष्यती अवस्था केली होती' असा उल्लेख या पुस्तकात आहेत. यामुळे संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली.
पुण्यात याचमुद्दयावरुन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तालयात दारूच्या बाटल्या नेऊन आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावर दारुच्या बाटल्या ठेवल्या.
तसंच या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे, लाखे प्रकाशन आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईची अशी मागणी ब्रिगेडने केली, तर शुभा साठे यांनी यासंदर्भात माफी मागितली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours