कोल्हापूर: कोल्हापुरातील वारणा कोडोली इथं आज (बुधवार) राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची ऊस परिषद होत आहे. या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजेरी लावणार आहेत. आज संध्याकाळी चार वाजता ही परिषद होणार आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आणि साखर कारखानदारांचं या ऊस परिषदेकडे लक्ष असणार आहे. कारण या ऊस परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यंदाचा उसाचा दर जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ऊस दराबाबत मोठी घोषणा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या या ऊस परिषदेला मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्रीही उपस्थित असणार आहेत.
राजू शेट्टींना शह देण्याचा प्रयत्न?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला शह देण्यासाठी ही परिषद घेण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण हे कायमच ऊस दराच्या प्रश्नाभोवती फिरत आलेलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours