कोल्हापुर: सम्पूर्ण राज्यातला उसाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच कोल्हापूरमधल्या साखर कारखानदारांनी मात्र धक्कादायक निर्णय घेतला आहे. आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे सर्व साखर कारखाने बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.
शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्याकडून गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्यानेच साखर कारखानदारांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान कोल्हापूर शहरातल्या एका हॉटेलमध्ये आज जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत माध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या मदतीशिवाय आम्ही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही असा सूर या बैठकीत आळवला गेला.
मात्र या बेमुदत बंदमुळे शेतातला ऊस किती दिवस तसाच राहणार हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान साखर कारखानदारांच्या या निर्णयावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours