मुंबई- संपूर्ण देशभरात सध्या #METOO चे वारे वाहताना दिसत आहेत. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या कलाकारांची नावं पुढे येत आहेत. नाना पाटेकर, अनु मलिक, आलोकनाथ, साजिद खान, विकास बहल, कैलाश खैर या कलाकरांचे नाव आतापर्यंत पुढे आले आहेत. तूर्तास या कलाकारांवर आरोप केले असले तरी आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र झालेल्या आरोपांमुळे या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कामावर बराच परिणाम झालेला आहे. या प्रकरणात आता चक्क बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचं नावही समोर आलं आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण हे खरं आहे.
त्याचे झाले असे की, #metoo प्रकरणाबाबद आपले मत व्यक्त करताना महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ७६ व्या वाढदिवशी ट्विट करत लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मोहिमेचं समर्थन केलं. त्यांनी आपला व्हिडिओ ट्विट करत म्हटले की, ‘मी महिलांसोबत होणाऱ्या गैरव्यवहारांच्या विरोधात आहे. कलाकार असो किंवा अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच लैंगिक छळ झाल्यास न्यायव्यवस्थेची मदत घ्यावी’ असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्हिडिओमार्फत केले.
आता चक्क अमिताभ यांच्या या ट्विटला सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना मोती भवनानीने आव्हान दिले आहे. अमिताभ यांच्या ट्विटला उत्तर देताना सपनाने लिहिले की, ‘हे सगळं साफ खोटं आहे. सर तुमचा 'पिंक' सिनेमा येऊन गेला आणि त्यात तुम्ही साकारलेली एका कार्यकर्त्याची छबीही झाकोळली गेली. आता लवकरच तुमच्याबद्दलचं सत्य जगासमोर येईल. याक्षणी तुम्ही चिंतेत तुमची नखं चावण्यापेक्षा पूर्ण हातच चावत असाल. कारण तुम्हाला नखं तर अपुरीच पडणार.’ सपनाच्या या ट्विटमुळे अख्खं बॉलिवूड खळबळून जागं झालं आहे. आता सपना नक्की अमिताभ यांच्याबद्दल काय बोलणार हाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours