पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेलाही खुलं आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात सभा घेण्याचं कारण म्हणजे मोदीजींना पाठिंबा देणारे खासदार संसदेत जातील आणि विरोध करणाऱ्यांना इथं उपस्थित कार्यकर्तेच उत्तर देतील अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघातच सेनेला खुलं आव्हान दिलं आहे.

कायमच भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी जणू अल्टिमेटम दिलं आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी हे चॅलेंज दिलं आहे.

तसंच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरीत आघाडी सरकारवरही मुख्यमंत्र्यांनी जोरदार तोंडसुख घेतलं. पिंपरीत अटल संकल्प महासंमेलनाला सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे संमेलनासाठी हजर होते.

कुणी काहीही लिहिलं छापलं, बोललं तरी महाराष्ट्रातला नंबर 1 चा पक्ष भाजपच आहे. इथे दोन मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना बोलावलं तर मैदान भरेल. यांनी राज्याचे लोक बोलावले तर 2 हजार सुद्धा येत नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी इतर पक्षांची फिरकी घेतली आहे. तर सरकार आणण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत असंही ते पुढे म्हणाले.

2019 ला आधीच्या पेक्षा जास्त जागा मोदींना मिळवून दिल्याशिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला खुलं आव्हान आहे.      'तुम्ही 15 वर्ष चालवलेलं सरकार आणि मी चार वर्षे चालवलेल सरकार. तुम्ही जर जिंकला तर मी निवडणूक लढवणार नाही. तुमच्यापेक्षा, अत्यंत उत्तम सरकार आम्ही चालवलं आहे.' तुम्ही सिंचनाच्या नावाखाली स्वतःची तिजोरी भरली असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केला आहे.

तर काँग्रेसच्या काळातले 9 हजार कोटींची कंत्राट रद्द करून आम्ही सगळे टेंडर बिल दिले आहेत. पिंपरी-चिंचवडची अनधिकृत घरं आमच्याच काळात नियमित करणार. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय सुरू केलं. मेट्रो आणली, तुम्ही काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours