बारामती, 5 नोव्हेंबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काय चौकशी करायची ती करा, होऊन जाऊ द्या एकदाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी,’ असं म्हणत अजित पवारांनी भाजपलाच आव्हान दिलं आहे.
दुष्काळी दौऱ्यावर बारामतीमध्ये आलेल्या अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. भाजपवाले त्यांचेच घोटाळे लपवण्यासाठी अशी वक्तव्य करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
सदाभाऊ खोतांवर टीकास्त्र
‘ज्या सदा खोतांना राजू शेट्टींनी आमदार केलं, मंत्री केलं त्यांनाच खोतांनी सोडलं. ज्यांच्यामुळे यांची ओळख निर्माण झाली ते त्यांचेच राहिले नाहीत तर इतरांचे ते कसे असतील, अशी टीका अजित पवारांनी केली.
गिरीश बापटांना चिमटे
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावरही अजित पवारांनी सडकून टीका केली. ‘माझा देठ हिरवा आहे, असं बापट म्हणतात. त्यांना कोणी विचारले का तुमचा देठ कसला आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला. तरूणांशी बोलताना बापट म्हणतात, तुम्ही रात्री जे पाहता ते मीही पाहतो. आता सांगा विद्यार्थी रात्रीचे काय पाहतात? अभ्यास करतात. हे काय अभ्यास करतात का? सुसंस्कृत पुण्याचे पालकमंत्री तारतम्य सोडून बोलतात, हे यांना चालते का? अशी बोचरी टीका ही अजित पवारांनी केली आहे.
राफेलवरून केंद्र सरकारला केलं लक्ष्य
राफेल मुद्द्यावरून अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राफेलबाबत सर्व माहिती समोर यायला हवी. मात्र ती लपवण्यासाठी सीबीआयच्या अधिकार्‍यांचीच रात्रीच्या दोन वाजता बदली केली जातेय, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours