उस्मानाबाद- अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे. ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते,’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावर मोठं वादंग तयार झालं. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
‘दुष्काळाबाबत केंद्राकडे मागितली मदत’
दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटींची मदत मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  केंद्राकडे जी मदत मागायची आहे त्याचा आराखडा जवळपास पूर्ण झाला आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठीही नाबार्डकडे 2200 कोटी मागितले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे अवनी वाघीण प्रकरण?
चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगून या वाघिणीला राज्य सरकारच्या आदेशानंतर ठार केल्यावर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं.
‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.
या क्रूर हत्येने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला होता
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours