अमरावती: "दिवाळी येऊन ठेपली पण दिवाळी कशी साजरी करायची? आता जगावं की मरावं" ही ही व्यथा तिवसा येथील मकेश्वर कुटुंबातील सदस्यांची आहे. मागील वर्षी नापिकी आणि यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिनचे उत्पादन अल्प तर पाऊसच नसल्याने कपाशी पार सुकून गेली त्यामुळे यंदाची दिवाळी मकेश्वर कुटुंबियांची अंधारात जाणार आहे. 

तिवसा येथील सुरेश मकेश्वर यांचे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ज्ञानमाता इंग्लिश स्कूलच्या मागे ६ एकर शेत आहे. त्यांचा सारा उदरनिर्वाह शेतीवर चालतो,त्यांनी यंदा ३.५० एकरात सोयाबिन पेरणी केली होती. यात त्यांना केवळ ५ क्विंटल सोयाबिन आले तर उर्वरित शेतीत कपाशीची पेरणी केली यात त्यांना फक्त १ क्विंटल कापूस निघाला, तर यंदा पाऊसच कमी झाला त्यामुळे उन्हाने कपाशीही पूर्णपणे सुकून गेली. 

त्यामुळे आता सोयाबीनही गेले आणि कपाशी सुकल्याने त्यातून कापूस निघणे बंद झाल्याने मकेश्वर कुटुंबावर संकट उभे ठाकले आहे. 

यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा सवाल त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता जगावं की मरावं याच विवंचनेत ते आहे. मला कोणी दिवाळी साजरी करायला पैसे देणार का असा मन व्यथीत करणारा प्रश्नच सुरेश मकेश्वर यांनी उपस्थितीत केला आहे. नाफार्डवाल्यांकडे गेलो तर ते चार चार महिने चुकारा देत नाही,व्यापाऱ्याकडे गेलं तर २५०० रुपये भाव देतो मग आम्ही करायचं तरी काय अशी व्यथाही त्यांनी मांडली. 

यंदा शेतीत चांगले उत्पन्न होईल, या आशेत मकेश्वर कुटुंब होते. मात्र, शेतीत उत्पादन झालेच नाही. त्यामुळे पुढील वर्षी शेतीच्या पैशांत मुलीचे लग्न करायचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांचे मुलीच्या लग्नाची चिंता असून माझ्यावर आत्महत्याची वेळ आली आहे असं हतबल होऊन सुरेश मकेश्वर सांगत होते. 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours