भिवंडी, 28 नोव्हेंबर : भिवंडी शहर आणि तालुक्यातील रिक्षा चालक-मालक महासंघातर्फे बेमुदत रिक्षा बंदचा निर्णय घेत मध्यरात्रीपासूनच रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी शहरातील रिक्षा वाहतुक बंद केली आहे. अचानक पुकारलेल्या या बंदमुळे सकाळी विद्यार्थी, चाकरमानी यांचे हाल होणार आहेत.
भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने रिक्षा दुरुस्तीचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्या खर्चाचा भुर्दंड रिक्षा चालकांच्या माथी येत असुन त्यामुळे रिक्षा चालक बेजार झाला आहे. आरटिओकडुन भिवंडी शहरात यापूर्वी रिक्षा पासिंग सुरू होती. तीदेखील अचानक बंद केल्याने रिक्षा पासिंगसाठी नेरुळला जावं लागतं.
या सगळ्यामुळे रिक्षा चालकांच्या वेळेत आणि खर्चात वाढ झालीये. त्यामुळे या सगळ्यावर आळा घालण्यासाठी आज संप पुकारला आहे. तर दुसरीकडे केडिएमटीने शहर बससेवा शिवाजी चौकापर्यंत सुरू केली ती तात्काळ बंद करावी. शहरातील अनधिकृत खाजगी बस सेवा तात्काळ बंद करावी अशा मागण्या या महासंघातर्फे मांडण्यात आल्या आहेत.
दरम्यान या शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होऊन या रस्त्यावर रिक्षा चालवणं अवघड झालं आहे.  रिक्षा चालक संघटनांकडुन शहरातील प्रवासी वाहतुक करणा-या खाजगी बस वाहनांवर पोलीस आणि आरटीओ विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने रिक्षा चालकास व्यवसाय करणं अवघड होऊन बसले असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours