19 नोव्हेंबर :  जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. पण शिवरायांना अंतराळातून पाहू नका ते राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.

गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जगातला सर्वत उंच पुतळ्यात सरदार पटेलांच्या पुतळ्याची नोंद झाली आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ वरून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा आण प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही आणि शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे  फडणवीसांनी ठणकावून सांगितले पाहिजे तरच तुम्ही महाराष्ट्राचे आहात असं आव्हानच सेनेनं केलंय.

तसंच गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अंतराळातूनही दिसतो त्यामुळे मोदीभक्त खूश आहेत. सरदार पटेल यांच्या कार्याची उंची भक्तांपेक्षा मोठी आहे. पटेलांचा पुतळा अंतराळातून दिसतो म्हणून पटेल मोठे नाहीत, पटेलांसारखे मोठे कार्य करून दाखवणे हीच पटेलांची उंची मोजण्याची ‘मोजपट्टी’ ठरली असती असा टोलाही सेनेनं लगावला.

पटेलांचा पुतळा 182 मीटरचा आहे व तो जगातील सगळ्यात उंच पुतळा ठरला. ‘‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आणि तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. सरदार पटेलांचा पुतळा गुजरात सरकारने बांधला आणि त्याचे लोकार्पण झाले. सरकारी तिजोरीची दारे त्यासाठी सताड उघडी ठेवली, पण महाराष्ट्रात शिवरायांच्या भव्य स्मारकाची अद्याप पायाभरणी झाली नाही याची खंत कुणाला वाटते काय?  असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

अरबी समुद्रात छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्याचे राजकारण थांबवायला हवे. पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे असं आवाहनही सेनेनं विरोधकांना केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. फडणवीस यांनी अशी घोषणा केली म्हणून मोदी, शहा त्यांच्यावर डोळे वटारणार नाहीत आणि सरदार पटेलांची प्रतिष्ठाही कमी होणार नाही. महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी चिंतामणराव देशमुख यांनी नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकला. ‘‘तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे’’ असे ठणकावून देशमुख संसदेच्या बाहेर पडले. त्या क्षणी चिंतामणराव देशमुख महाराष्ट्राचे कंठमणी झाले अशी आठवणही सेनेनं मुख्यमंत्र्यांना करुन दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours