सर्व नळ योजनांना सोलर पंप बसवा
भंडारा,दि. 17: - भंडारा शहरासाठी 57 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येक वार्डात आरो प्लांट लावण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोत्तम प्राधान्य असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा पाणी टंचाईचा आराखडा तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा उपविभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे,  जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
पाणी टंचाईचे आराखडे तयार करण्यात यावे व ते जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात यावेत. तात्काळ प्रपत्र अ ब तयार करावे. भंडारा उपविभागातील 3 एचपी च्या व 5 एचपीच्या नळयोजना सौर ऊर्जेवर आणाव्यात. प्रादेशिक दोन योजना आहेत या सौर ऊर्जेवर आणाव्यात. बंद जुन्या व खराब झालेल्या बोअरवेल अभिलेख्यावरून कमी करण्यात याव्यात. 
वैनगंगा नदीकाठावरील गावांना आरो प्लांट लावण्यात येतील. भंडारा शहरात वार्डनिहाय पाणी शुद्धीकरण प्लांट लावण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समिती मधून नगरपालिकेला फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच निधी देण्यात येइल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. शहरात 5 प्लांट सुरू करण्यात आल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले. सोबतच वाटर एटीएम प्लांट बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले. 
भंडारा शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी दोन नवीन नळ योजनेचा तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. शहरासाठी 57 कोटींची नवीन नळयोजना तयार करतोय, आरो प्लांट सुद्धा लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पांदण रस्ते योजना
पालकमंत्री पांदण रस्ते योजनेचा ग्रामस्तरीय फेर आराखडा सात दिवसात पाठवावा. प्रत्येक ग्रामपंचायतीला शासन निर्णय पाठवावा. डिसेंबर मध्ये जिल्हास्तरीय आराखडा अंतिम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात 100 किलोमीटर पांदण रस्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. पालकमंत्री पांदण योजनेची माहिती देण्यासाठी जानेवारीत सरपंच यांची कार्यशाळा घेण्यात यावी. या कार्यशाळेत प्रत्येकाची जबाबदारी समजावून सांगण्यात यावी असे पालकमंत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत भंडारा जिल्ह्यात 1127 किलोमीटर रस्ते होणार आहेत. 650 कोटींची रस्ते कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रस्त्यांच्या सर्व कामांचे जीओ टॅगिंग करण्यात यावे. शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या कामांची माहिती विभागाने लेखी स्वरूपात कळवावी ती मार्गी लावण्यात येईल, असे ते म्हणाले.
हर घर बिजली सौभाग्य योजनेत 2913 लाभार्थ्यांना लाभ दिला असून 288 लाभार्थी प्रगतिपथावर आहेत. काही लाभार्थी सुटले असल्यास ग्रामपंचायत सचिवांशी संपर्क करून यादी मागविण्यात यावी असे त्यांनी सांगितले. शेवटच्या माणसाला लाभ मिळेपर्यंत उद्दिष्ट राहणार आहे, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील विजेचे कठीण स्पॉट व 497 अपघात प्रवण स्थळ काढण्यासाठी 2019-20 साठी जिल्हा नियोजन समितीमधून दहा कोटी देण्यात येतील. यासाठीचा प्रस्ताव वीज विभागाने पाठवावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्ह्यात 82 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 200 कोटींची कर्ज माफी झाली असून डिसेंबर अखेर सर्व सातबारा कोरा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. पीक विमा योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पेंचचे पाणी टेल पर्यंत पोहचले नाही अशा शेतकऱ्यांचा समावेश पीक विमा योजनेत करण्यात येणार आहे. ज्या बँकांनी कर्ज वाटपात मदत करत नाहीत त्यांच्या शासकीय ठेवी काढून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत पाणी टंचाई, जलसंधारण व सिंचन, पालकमंत्री पांदण रस्ते योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम व जि. प. रस्ते योजना, मुख्यमंत्री सोलर कृषी फिडर आणि महावितरण कृषी कनेक्शन, कृषी कर्ज माफी, पीक कर्ज वाटप आणि पीक विमा योजना, शासकीय जमिनीचे पट्टे वाटप आणि सर्वांसाठी घरे, वर्ग दोनचे वर्ग एक रूपांतर आणि अन्न सुरक्षा योजना व प्रधानमंत्री उज्जवला योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours