मुंबई: फिल्म निर्माता पहलाज निहलानी यांची मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. निहलानी यांचा आगामी सिनेमा 'रंगीला राजा' वर सेन्साॅर बोर्डानं कात्री लावलीय. संपूर्ण सिनेमात सेन्साॅर बोर्डानं  20  कट मारलेत. सेन्साॅर बोर्डानं जाणूनबुजून हा कट रचल्याचा पहलाज निहलानींनी  आरोप केलाय.
पहलाज निहलानी  सेन्साॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. ते म्हणाले,  मी सेन्साॅर बोर्डवर असताना केंद्रीय मंत्र्यांचे कॉल यायचे, मी  बोर्डवर असताना त्यांचं ऐकलं नाही म्हणून मला त्रास दिला जातोय.' सेन्साॅर बोर्डावर सतत केंद्रीय मंत्र्यांची ढवळाढवळ सुरू असते असा आरोपही निहलानींनी केलाय.
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी बरेच आरोप केले होते. 'लेहरें' या यूट्यूब एन्टरटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. यात प्रामुख्याने आपल्याला पदावरून हटवण्यासाठी त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना जबाबदार धरलं होतं. स्मृती यांनी आपल्याला 'इंदू सरकार' आहे तसा रिलीज करण्याचे निर्देश दिले होते मात्र आपण तसं केलं नाही. त्यामुळेच आपली उचलबांगडी झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
'उडता पंजाब' हा सिनेमा रिलीज न करण्यासाठी आणि सलमानचा 'बजरंगी भाईजान' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी त्याकाळात मंत्रालयातून आपल्यावर प्रचंड दबाव टाकला गेला होता, असा गौप्यस्फोट पहलाज निलहानी यांनी केला होता. तसंच अनुराग कश्यपने त्याच्या सिनेमाला फायदा व्हावा यासाठी वाद उकरून काढल्याची टीकाही त्यांनी केली होती.
सेन्सॉर बोर्डात अनेक दलाल सक्रिय असून त्यांच्यामार्फत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचाही गंभीर आरोप निहलानी यांनी केला होता. पण या सर्व गोष्टी त्यांनी पदमुक्त झाल्यावरच का जाहीर केल्या त्यावर मात्र त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नव्हतं
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours