पिंपरी चिंचवड, 28 डिसेंबर :  पिंपरी चिंचवड महापालिकेतील उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका  6 वर्षीय चिमुकल्याला  कायमचं अपंगत्व आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उद्यानातील नादुरुस्त खेळण्यांवर खेळत असतांना त्या चिमुकल्याचं बोटच तुटून पडलं. पण तरीही महापालिका मात्र झोपेत आहे.
अथर्व जोशी असं या जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. अवघ्या 6 वर्षांच्या या चिमुकल्याच्या उजव्या पायाची करंगळी तुटून बाजूला पडली आणि त्यामुळे अथर्वला कायमच अपंगत्व आलं. चार दिवसांपूर्वी  शहरातील संभाजी पार्कमधील घसरगुंडीवर खेळताना हा अपघात झाला. मात्र एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा अजूनही ही घसरगुंडी बदलण्यात आली नाही.
पिंपरी महापालिकेतर्फे शहरात तब्बल 178 उद्यानं चालवली जातात. त्यातील बहुतांश उद्यानातील खेळणी अश्याच प्रकारे धोकादायक बनली आहेत. दुसरीकडे, केवळ ठेकेदाराकडून पैसे खायला मिळत नसल्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  या  खेळण्याच्या दुरुस्तीसाठीची  सुमारे 3 कोटी रुपये  निविदा रखडुन ठेवल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्याच  एका अधिकाऱ्याने न्यूज18 लोकमतला दिली आहे.
त्यामुळे अथर्वला आलेल्या अपंगत्वाला पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाच जबाबदार आहे.  मात्र प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असल्याने ती जबाबदारी कुणी स्वीकारणार नाही हे स्पस्ट आहे. त्यामुळे आता ही  महापालिका चालविणारे सत्ताधारी तरी या गंभीर बाबीकडे लक्ष देतात का आणि अथर्वला न्याय देऊन संबंधितांवर कारवाई करतात का  याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours