पिंपरी चिंचवड, 20 डिसेंबर : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये संतोष शिंदे हे त्यांच्या कुटुंबासह बेपत्ता झाले आहेत. संतोष शिंदे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारी झाल्याने आम्ही संपूर्ण कुटुंब सामूहिक आत्महत्या करणार असल्याची एक चिठ्ठी त्यांच्या घरात सापडली. त्यामुळे सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. पिंपरीतल्या मोहननगर परिसरातील ही घटना आहे. यासंदर्भात आता पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे 5 डिसेंबरला हे कुटुंब बेपत्ता झालं आहे. त्यांचा अजूनही काहीच शोध लागलेला नाही. या शिंदे कुटुंबात एकूण 4 लोक आहेत. त्यांच्यावर 2 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ज्याच्याकडून कर्ज घेतलं तो सतत त्रास देत असल्याच्या नैराश्यातून आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं चिठ्ठीत लिहण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

5 डिसेंबरला शिंदे यांच्या ड्रायव्हरने त्यांना रेल्वे स्थानकावर सोडलं. त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. घरातून जाताना या चौघांनी आपले मोबाईल फोन घरीच ठेवले. त्यामुळे शिंदे कुटुंबीय नक्की कुठे गेले असा प्रश्न आता पोलिसांसमोरही आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours