कल्याण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौ-याला उत्तर भारतीय महापंचायत विरोध करत काळे झेंडे दाखवणार आहे. उत्तर प्रदेशचा विकास न केल्याबद्दल मोदींच्या दौ-याचा विरोध करण्याची भूमिका उत्तर भारतीय मंचाने घेतली आहे.
उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवूनही तिथला विकास न करणाऱ्या नेत्यांना तुम्ही जाब विचारा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते. पंतप्रधान मोदींचं मूळ राज्य हे गुजरात असलं तरीही त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशच्या वाराणसी या मतदारसंघातून लढवली होती. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला आता उत्तर भारतीयांकडून विरोध होत आहे.
'नरेंद्र मोदी ज्या मार्गावरुन जाणार तिथं आम्ही आंदोलन करणार आहोतं. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी न दिल्यास जेलभरो आंदोलन करणार आहोत. तसंच यावेळी मोदींना काळे झेंडे दाखण्यातील येतील,' असा इशारा उत्तर भारतीय महापंचायतीनं दिला आहे. उत्तर भारतीय मंचाच्या या इशाऱ्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यावेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर महापंचायतीनं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात राज यांनी उत्तर भारतीयांना आवाहन करत म्हटलं होतं की, 'तुमच्या राज्यातून निवडून आलेले अनेकजण पंतप्रधान झाले. तरीही हे नेते तुम्हाला तिथं रोजगार का देऊ शकले नाहीत, विकास का करू शकले नाहीत, याचा तुम्ही नेत्यांना जाब विचारायला पाहिजे.'
यापुढे उत्तर भारतातून निवडून आलेल्या कोणत्याही नेत्याला आम्ही मुंबईत येऊ देणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांच्या कार्यक्रमातच उत्तर भारतीय मंचाने केली होती. त्यानुसार आता पंतप्रधान मोदींना विरोध होत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours