रिपोर्टर परदेशी
यवतमाळ : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती आणि घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त शेतकरी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संकटग्रस्त शेतक-यांंची दुष्काळ परिषद आयोजीत करण्यात आली आहे. दि.८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता घाटंजी तालुक्यातील पारवा येथे जि.प.शाळेच्या मागील खुल्या मैदानात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

परिषदेचे उद्घाटन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सुकाणू समितीच्या नेत्या प्रा.सुशिला मोराळे राहतील. परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अजय तल्हार, सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्यसंघटक किशोरदादा ढमाले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

निसर्गाचा लहरीपणा व सरकारच्या निष्ठुरपणामुळे शेतकरीवर्ग पुर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सततची नापिकी, पिक विम्यातून भरमसाठ लुट, फसवी कर्जमाफी, शासन निर्मित भारनियमनाचे संकट आणि जंगली जनावरांच्या जबड्यात अडवूâन पडलेली शेती यामुळे शेतक-यांचे भविष्य अधिकच अंध:कारमय झाले आहे. या संकटातून खंबीरपणे बाहेर पडून कायदेशीर लढा देता यावा आणि शेतक-यांच्या एकुणच समस्यांना तात्काळ वाचा फोडण्यासाठी संकटग्रस्त शेतक-यांच्या दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वगळलेले मंडळ त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करावे, जंगली जनावरांचा समुळ बंदोबस्त व्हावा, कृषीपंपाचे लोडशेडींग पुर्णपणे बंद करावे, सरसकट पिक विमा लागू करावा, विना अट शेतक-यांचे संपुर्ण पीककर्ज माफ करावे, अतिक्रमणधारक शेतक-यांना शेत जमिनीचा पट्टा द्यावा, सिक्कीम राज्याच्या धर्तीवर राज्यातील शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. दरम्यान या परिषदेत शाहीर नागोराव गुरनुले यांचा शेतकरी गीतांचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे.

या परिषदेला घाटंजी, पांढरकवडा व आर्णी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, माजी जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, बाजार समितीचे माजी सभापती सचिन देशमुख पारवेकर, मिलिंद धुर्वे, राजेंद्र हेंडवे, शैलेश इंगोले, पं.स.चे माजी सभापती रूपेश कल्यमवार, अशोक भुतडा, यशवंत इंगोले, सुहास पारवेकर, किरण कुमरे यांनी केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours