जळगाव, 3 डिसेंबर : कोणतंही शहर अन् गावात एरवी नाक मुरडायला भाग पडणाऱ्या तुंबलेल्या गटारी सर्वांनाच नकोशा असतात. मात्र सुवर्णनगरी असलेल्या जळगावात चक्क सोनं देणाऱ्या गटारी आहेत. आश्चर्य वाटेल परंतु सोने बाजारातल्या या गटारी या बेरोजगारांसाठी वरदान ठरल्या आहेत. चांगले शिक्षण घेऊन देखील रोजगार मिळत नसल्याने गटारीतून मिळणाऱ्या सोन्यावर हे तरुण आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत आहेत.

जळगाव ही राज्यातलीच नाही तर देशातली सोन्याची एक मोठी बाजापेठ आहे. त्याचबरोबर सोन्याचे दागिणे घडविण्याचा मोठा व्यवसाय जळगावात सुरू असतो. बंगाली कारागिर यात तज्ज्ञ असून जळगावात त्यांची संख्या मोठी आहे. हे कारगिर काम करताना सोन्याचे सुक्ष्म कण हे उडत असतात.

दुकानात, कामाच्या ठिकाणी देखील पडत असतात. दुकान झाडण्यातून, हातपाय धुताना किंवा दागिने घडवताना वापरात येणाऱ्या पाण्यातून जड असणारे सोन्याचे कण गटारीत जातात.  काही युवक हे या गटारांमधून गाळ काढून तो स्वच्छ करतात आणि त्यातून सोनं काढतात. तर या गटारांमध्ये फार काही सोनं नसतं असं मत सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गौतम जैन यांनी व्यक्त केलंय.

अशा प्रकारंचं सोनं काढण्याचं काम करणारे 40 पेक्षा जास्त तरूण इथं आहेत. सुरुवातीला  ते संपूर्ण गटार न उपसता विशिष्ट ठिकाणचा गाळ बाहेर काढतात. नंतर एका टोपलीत थोडा थोडा गाळ घेऊन तो गटारीच्याच पाण्यात 10 ते 15 वेळा गोल फिरवला जातो.

वरवर असलेला गाळ प्रत्येक फेरीनंतर बाहेर फेकला जातो. 15 ते 20 मिनिटे टोपली फिरवल्यानंतर सोने आणि अन्य धातू टोपलीत खालच्या बाजूला एकत्र येतात. शेवटच्या टप्प्यात उरणारे धातू सोबतच्या वाटीत जमतात. मात्र धातूमध्ये सोनेच सापडते असं नाही तर यात पितळ आणि इतर धातूही सापडतात.

हे विकून त्यांना कधी जास्त तर कधी कमी पैसे मिळतात मात्र घर चालेल इतके पैसे यातून मिळते असं हे काम करणाऱ्या तरुणांचं म्हणणं आहे. शिकूनही हाताला काम नसल्यानं हे काम या तरुणांनी स्वीकरालंय.  बेरोजगार युवक नाक न मुरडता गरज म्हणून या गटारीत उतरतात.

कोणत्या गटारीत किती वेळात, किती सोने मिळेल, कोणत्या वेळेत, सीझनमध्ये मिळेल, याबद्दल हे युवक अनुभवातून खात्रीपूर्वक सांगतात. पण चांगली नोकरी मिळाली  तर हे काम सोडून देण्याचीही त्यांची तयारी आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours