मुंबई, 21 डिसेंबर : 'जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नका, अन्यथा पुन्हा 2014 सारखी परिस्थिती निर्माण होईल,' असा इशारा देणारं पत्र मराठा ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
मराठा आरक्षण लागू होण्याआधीच जर मेगाभरती करण्यात आली तर तणाव निर्माण होईल. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल आणि त्याला संपूर्णपणे सरकारच जबाबदार असेल, असं या आंदोलकांच्या पत्रात म्हणण्यात आलं आहे.
काय आहे मेगाभरतीचा गोंधळ?
मेगाभरतीला स्थगिती नाही, अशी भूमिका नुकतीच सरकारने कोर्टात मांडली आहे. त्याचवेळी 23 जानेवारीपर्यंत मेगाभरतीद्वारे कोणतीही नेमणूक होणार नसल्याची ग्वाहीदेखील राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केलं होतं.
दरम्यान, मेगाभरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघानं केली होती. त्यावर हायकोर्टात बुधवारी सुनावणी होताना मेगाभरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours