मुंबई, 12 जानेवारी : 'शिवसेनेसोबतच्या युतीबाबत दिल्लीत आता चर्चा होणार नाही. प्रथम राज्यात चर्चा होईल,' असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी युतीवर भाष्य केलं आहे. शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युतीची चर्चा प्रथम राज्यपातळीवर व्हावी आणि जर गरज पडली तर केंद्रात व्हावी अशी आमची भूमिका आहे, असं आता रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
मोठा भाऊ कोण?
'मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण, हे जनताच ठरवेल,' असं म्हणत युतीत शिवसेनेला झुकतं माप मिळणार नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी सुचवलं आहे. 
युतीसाठी पंतप्रधान मोदींचा पुढाकार
शिवसेनेसोबतचा तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आणि समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर यावेत असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर मांडला असल्याचीही माहिती आहे. भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या प्रयत्नांनंतर शिवसेना नेमका काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours