बारामती : 'मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर, लाळ गाळायचे बंद होते'. या अर्धवट माहितीने ऊसतोड करणाऱ्या महिलेनं मुलीच्या तोंडात चक्क जिवंत मासा फिरवला. पण, गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट लहान बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला आणि त्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली. शिर्सूफळहून बारामतीला येईपर्यंत तिचा श्वासही बंद झाला, पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी देऊन प्राण वाचवले. 
मुळचे चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी याचे कुटुंब भिमा पाटस कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी बारामती तालुक्यात आले आहे. ते शिर्सूफळ येथे राहत असून बापू यांची साडेचार महिन्यांची मुलगी अनू ही जन्मल्यापासून तोंडातून लाळ गाळते. कोणीतरी सांगितले की, मुलांच्या तोंडातून मासा फिरवला तर लाळ गळणे बंद होते. मग काय, पाण्याच्या पाटचारीत मासा शोधला. बोटुकलीच्या आकाराचा जिवंत मासा तिने आणून तो त्या लहानग्या अनुच्या तोंडातून फिरवायचा प्रयत्न केला. मात्र, मासा बुळबुळीत असल्याने तो निसटून अनूच्या थेट तोंडात गेला. मुलीने मासा गिळल्यामुळे अन्ननलिकेतून श्वसनलिकेपर्यंत गेला आणि तिचा जीव घुसमटला. हे पाहताच बापू माळी याने शेजाऱ्याची दुचाकी घेऊन बारामतीला धाव घेतली. 
बारामती येथील डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात चिमुकल्य़ा अनुला घेऊन येईपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करीत हृदय पुन्हा चालू करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
त्यानंतर लागलीच तिच्यावर दुर्बिंणीच्या सहाय्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया दहा मिनिटं चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तिला तोपर्यंत जे झटके येत होते, ते कमी होण्याची इंजेक्शन देऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात आली आणि डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला.
चिमुकलीच्या आई-वडिलांना तर डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच सुचत नव्हते, त्यांनी डोळ्यातील पाण्यानेच डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी दिली आणि दवाखान्यातील इतर पालकांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि अत्यंत युद्धपातळीवर केलेल्या शस्त्रक्रियामुळे आज ऊस तोड मजुराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours