मुंबई, 14 फेब्रुवारी : युतीची चर्चा ट्रॅकवर आणण्यासाठी भाजपचे दिल्लीतील मोठे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण भाजपचा दिल्लीतील कोणताही नेता युतीकरता मातोश्रीची पायरी चढणार नाही, अशी माहिती आता भाजपमधील सूत्रांकडून मिळाली आहे. 
युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील युतीचा अंतिम फॉर्म्युला दिल्लीत नव्हे तर राज्यातच ठरण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, शिवसेनेकडून युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच मग आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीच आता भाजपकडून अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग हे तीन दिग्गज नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं वृत्त बुधवारी आलं होतं. पण भाजपमधील सूत्रांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
महाराष्ट्रात युतीचा बिहार पॅटर्न?
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वांच्या मुखी एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेना – भाजप युतीचं काय? युती होणार कि स्वबळावर लढणार? कोण जिंकणार सर्वाधिक जागा? अशातच शिवसेनेनं भाजपसमोर 1995च्या फॉर्म्युल्यानुसार चालण्याचा आग्रह धरल्यानं भाजप शिवसेनेसमोर नमते घेणार का? अशी चर्चा सध्या दिवसभर रंगताना दिसत आहे. या साऱ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण देखील 'बिहार'च्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours