सोलापूर, 28 फेब्रुवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एल्गार मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले व माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपबरोबरच स्वाभिमानीच्या आव्हानाचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी आपण माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच घोषीत केलं. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख हे भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच आता स्वाभिमानीनेही रणशिंग फुंकलं आहे. 
स्वाभिमानीची स्वबळावर 9 मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वेळापूर इथल्या मेळाव्यात केली आहे. 
भाजपकडून माढ्यात सुभाष देशमुख
शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं भाजपनंही दंड थोपटले आहेत. रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी माढ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं आता भाजपनं सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकरांनी बारामतीमधून लढण्याची तयारी केल्यानं भाजपनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours