श्रीनगर : सकाळच्या सुमारास भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं होतं. या दुर्घटनेत नाशिकच्या वैमानिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे असं वैमानिकाचं नाव आहे. ते मुळचे नाशिकचे रहिवासी होते.
तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली होती. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
नाशिकचे निनाद हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. (एसपीआय ही जास्तीत जास्त मराठी मुलांची  सैन्यधिकारी म्हणून निवड व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली संस्था)  तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून रुजू झाले. बुधवारी सकाळी विमानाच्या अपघातात निनाद शहीद झाले.
दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली होती.
भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours