मुंबई, 15 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली आहे. गुरूवारी रात्री भाजपच्या या दोन नेत्यांनी युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.
संसदीय अधिवेशनानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपलं सगळं लक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे केंद्रित केलं आहे. गेले अनेक दिवस युतीचा अडलेला मार्ग तात्काळ मोकळा करण्याचा आग्रह राष्ट्रीय अध्यक्षांकडून राज्यातील नेत्यांना करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड सुरू असलेल्या चर्चांनी उघडपणे टव्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधला. खरं तर मुख्यमंत्री काल वाशिम दौ-यानंतर लगेचच नागपूरला जाणार होते पण मातोश्री भेटीकरता त्यांनी वाशिमहून थेट मुंबई गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
सुमारे दीड तासाच्या चर्चेनंतर दोन्ही पक्षाकडून युती झाली असल्याची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.
सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना लोकसभेसह विधानसभा निवडणुकीसाठी अर्ध्या अर्ध्या जागांच्या मागणीवर ठाम आहे. लोकसभेच्या अर्ध्या - अर्ध्या जागावाटपाची सेनेची मागणी भाजपला मान्य होण्याची शक्यता कमी आहे. तसंच युती फक्त भाजपशीच होणार असून मित्रपक्षांशी नाही असे सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे मित्रपक्षांना भाजपने सोडलेल्या मतदारसंघातूनही सेनेचे उमेदवार लढणार असल्याची शक्यता आहे.
समसमान जागावाटप, मुख्यमंत्रिपदाची मागणी आणि घटक पक्षांची जबाबदारी घेणार नाही, या शिवसेनेच्या अटी - शर्थींमुळे भाजपच्या समोरचा पेच वाढताना दिसत आहे. मात्र सेना आपल्या बार्गेनिंग पॉवरचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours