मुंबई: 'गुरुवारी जवान शहीद झाले असताना युतीची चर्चा सुरू होती. हे दुर्दैवी आहे' अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने मुंबईतील रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते.
'जवान शहीद झाल्यानंतर देश स्तब्ध झाला असताना सत्ता आणि स्वार्थाच्या तडजोडीसाठी युतीच्या बैठका सुरू होत्या' अशा शब्दात नारायण राणे यांनी मुंबई गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवर टीका केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यात युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं.
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 52 वर्षात शिवसेनेमं काय केलं अशी टीका करत 'मुंबईच्या मराठी माणसाच्या जीवावर तुम्ही तुडुंब झालात मग मुंबईत मराठी टक्का कमी कसा झाला?' असा थेट सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.
'मराठी माणसाला बाजूला करायचं आणि कंपनीच्या बरोबर तडजोडी करायच्या हा धंदा शिवसेनेनं मराठी माणसासाठी नाही तर पैशासाठी केला' अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी बेस्टचा संप का नाही मिटवला? ते मराठी माणूस नाहीत का ? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours