मुंबई, 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत राज्यातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थंडावेल. या चौथ्या टप्प्यामध्ये मुंबईत मतदान पार पडणार आहे. शेवटच्या दिवशी प्रचाराचा जोर कायम असून अनेक राजकीय घडामोडी देखील दिसत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत विरूद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा अशी लढत आहे. पण, मतदानाच्या दोन दिवस अगोदर अखिल भारतीय सेनेनं आपला पाठिंबा हा महायुतीला जाहीर केला आहे. त्यामुळे त्याचा फायदा हा शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना होणार का? अशी चर्चा रंगली आहे. शुक्रवारी रात्री गीता गवळी, आशा गवळी आणि विजय आहीर यांनी आपला पाठिंबा महायुतीला जाहीर केला. यावेळी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे देखील उपस्थित होते.
काय आहे दक्षिण मुंबईचं राजकीय गणित 
दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

मिलिंद देवरा नवे अध्यक्ष
काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या दिवसांतच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्याकडे संघटनात्मक पाठबळ आहे. काही उद्योगपतींनीही त्यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे याचा त्यांना फायदा होऊ शकतो, असं म्हटलं जातं. त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा यांनी याआधी या मतदारसंघात केलेलं काम आणि विश्वासार्ह प्रतिमा याही त्यांच्या जमेच्या बाजू ठरतील, अशी चिन्हं आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours