जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अंतिम टप्प्यात आलं असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॉकपोलची मतं डिलीट न केल्यामुळे पुन्हा फेरमतदान करण्यात येणार आहे. मॉकपोलमुळे फेरमतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे असं म्हटलं जात आहे.
मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून ही चूक जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भडगावमध्ये घडली आहे.  त्यामुळे 107 नंबरच्या बूथवर पुन्हा एकदा नव्यानं मतदान होणार आहे. मॉकपोल करतानाची 50 मतं डिलीट न केल्याचा प्रकार समोर आला. या चुकीमुळे केंद्र अध्यक्षासह  2 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) 50 मते डिलीट करण्यात आली नाहीत त्याचबरोबर 3 मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणास जबाबदार धरून भडगाव येथील मतदान केंद्र क्र. 107 वरील केंद्राध्यक्ष आणि एक महिला कर्मचारी अशा 2 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीने फेरमतदान होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात येत आहे. भडगाव येथील मतदान केंद्र क्र. 107 वर 29 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती देत पत्रकही जारी करण्यात आलं आहे.
एकदा मतदान झाल्यानंतर मॉकपोलमुळे पुन्हा मतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 23 एप्रिलला या केंद्रात मतदान पार पडलं. पण आता या कारवाईनंतर पुन्हा 29 एप्रिलला मतदान होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे आदेश काढले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव बाबूराव पाटील ( सहायक शिक्षक, योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु.ता.अमळनेर) आणि मतदान अधिकारी क्र. 3 सुनीता नारायण देवरे (शिक्षिका, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव) यांचा समावेश आहे.
जळगांव लोकसभा मतदारसंघातील 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 107 इथे 29 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours