नवी मुंबई, 27 एप्रिल : मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली नवी मुंबईतील सभेचा फज्जा उडाला आहे. प्रमुख नेत्यांनी सभेकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्तेही सभेला अनुपस्थित राहिले. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले शेकापचे आमदार डुलक्या घेत असल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेच्या चौथ्या टप्यात मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या जागेवरून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडून कामोठे इथं प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाआघाडीच्या या सभेला लोकांची तुरळक गर्दी असल्याने नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. 
या सभेला खरंत राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे  भोसले, धनंजय मुंढे , सुप्रिया सुळे , जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि शशिकांत शिंदे  येणार होते. मात्र प्रमुख नेत्यांनीच सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सुनिल तटकरे आणि शशिकांत शिंदे यांचीच फक्त सभेला उपस्थिती होती. आधीच गर्दी कमी होती, त्यात उदयनराजे येणार नसल्याचे कळताच काही लोकांनी काढता पाय घेतला. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डुलक्या मारण्यात व्यस्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सभेचा चांगलाच बेरंग झाला.

मावळमध्ये राष्ट्रवादी Vs शिवसेना
मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण ही लढाई आता श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार उतरवला आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावणार आहे.
अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळमधील लढत चुरशीची ठरणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours