रावेर, 12 एप्रिल : रावेर लोकसभा मतदारसंघातील युतीमधील तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व भाजपच्या रावेरमधील उमेदवार रक्षा खडसे यांना जळगाव जिल्हात धुमसत असलेल्या भाजप-शिवसेना वादाचा फटका बसू नये, यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
शिवसेना आणि भाजप नेते एकनाथ खडसे हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याकरता भुसावळ इथं शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश जैन, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपने केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचून दाखवला. 
काय म्हणाले शिवसेनेचे गुलाबराव पाटील?
"काल जे झाले ( अमळनेर येथे झालेला राडा) त्यावेळी मी आणि गिरीश महाजन दोघेही मंत्रिपद विसरलो. आपली ताकद लढण्याचीच आहे. पण राज्यात सोबत असताना भाजपाने आम्हाला कमी त्रास दिला नाही. मंत्रिपद दिले म्हणून बोलणार नाही असा जर समज असेल तर तो दूर करावा. ," असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 
"खासदार तुमचा, आमदार तुमचा, जिल्हा परिषद तुमची, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा असते की आपला कुणी पदाधिकारी अशा पदावर असला पाहिजे. खासदार पदासाठी तुम्ही उभे राहिला की शिवसेनेशी युती करता नंतर युती तोडून टाकता," असा टोलाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours