वर्धा, 8 एप्रिल : वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमरावतीच्या जरूड इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका तरूणाने आमदार अनिल बोंडे यांना विकासकामासंदर्भात काही प्रश्न विचारल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला.
मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा? असा प्रश्न भाजपच्या प्रचारसभेत विद्यमान खासदार रामदास तडस व भाजप आमदार डॉ अनिल बोंडे यांना एका तरुणाकडून विचारण्यात आला. त्यानंतर या प्रचारसभेत गोंधळ उडाला. या गोंधळानंतरही नेत्यांनी आपली भाषणं सुरूच ठेवल्याचंही पाहायला मिळालं.
ज्या तरुणानं विकासाची अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, भर सभेत नेत्यांना विकासकामांबद्दल लोकांकडून प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांना गावातील लोकांनी पाच वर्षात काय केलं अशा प्रश्नांचा भडीमार केला. केज तालुक्यातील माळेगाव इथं हा प्रकार घडला.
गावातील लोकांनी ठोंबरे यांचा सत्कार केला. पण जेव्हा भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा गावातील लोकांनी पाच वर्षांचा हिशोब विचारायला सुरुवात केली. विकास कामे, निधी, पीक विमा, रस्ते कुठे आहेत असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आयोजक आणि ग्रामस्थ हमरीतुमरीवर आले होते.
अचानक उडालेल्या या गोंधळामुळे आमदार ठोंबरे देखिल संतापल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच आमदार संगीता ठोंबरे या सध्या विरोधकांकडून सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours