मुंबई, 12 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्रपक्ष भाजपला सल्ला दिला आहे. 'राफेल, मोदी चित्रपटावर बंदी आणि नमो टीव्हीचे प्रसारण थांबविणे या धक्क्यांनंतर भाजपला बुधवारी बसलेला चौथा धक्का महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत राडेबाजीचा होता. अशा हाणामाऱ्यांना फक्त मतभेद म्हणून सोडून देता येणार नाही. निदान राफेलबाबत तरी संयमाने बोलणे गरजेचे आहे. संरक्षणमंत्र्यांपासून सगळेच राफेल प्रकरणाचा निकाल येताच भांबावल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याचाच धोका आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला आहे. बुधवारचे धक्के पचवून उभे राहावे लागेल', अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सामनातून मांडली आहे.
नेमके काय आहे आजचे सामना संपादकीय?
- नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. बंदी कायमची नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी आहे. मोदी यांच्यावरील ‘बायोपिक’ आता प्रदर्शित झाला तर मतदारांवर प्रभाव पडेल असा हल्लाबोल विरोधकांनी केला. हा त्यांचा आक्षेप तसा योग्य नाही. चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी मोदी यांचा प्रभाव आहेच, पण निवडणुकीत अशा चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे हा आदर्श आचारसंहितेचाच भाग आहे.
- चित्रपटाबरोबर अचानक उगवलेल्या ‘नमो’ टीव्हीचे प्रसारणही निवडणूक आयोगाने थांबविले. मोदी यांच्या प्रचारासाठी स्वतंत्र ‘नमो’ टीव्हीची गरज होती की नव्हती हा भाजपचा विषय आहे, पण तसे पाहिले तर एखाद्दुसरे चॅनल वगळता सगळीच चॅनेल्स ही ‘नमो’मय बनली आहेत. मोदी यांची भाषणे व भूमिका अग्रक्रमाने दाखवण्यात येतात.
- भारतीय जनता पक्षाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रभाव आहे व त्याचा फायदा होत असताना ऐन निवडणुकीत ‘मोदी’ चित्रपट प्रदर्शनाचा हट्ट व ‘नमो’ टीव्हीसारखे प्रयोग विरोधकांच्या डोळय़ांत खुपू शकतात हे लक्षात घेतले गेले असते तर बंदीहुकमाची नामुष्की टाळता आली असती.
- जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन जगभरात झाले. ‘ठाकरे’ चित्रपटास निवडणूक आचारसंहितेचा फटका बसू नये व हा चित्रपट फक्त निवडणूक प्रचारासाठी निर्माण केल्याची भावना होऊ नये ही आमची भूमिका होती. त्यामुळेच जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ प्रदर्शित झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours