मुंबई : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांची अवस्था कठीण आहे. जेटच्या एकूण 16 हजार कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. या नैराश्यामुळेच जेट एअरवेजच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाने आत्महत्या केली आहे.
शैलेश सिंग असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 45 वर्षांचे शैलेश सिंग यांना कॅन्सर झाला होता. त्यातच आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. शैलेश सिंग हे नालासोपारामध्ये राहत होते. त्यांच्या चारमजली इमारतीच्या गच्चीवरून उडून मारून टाकून त्यांनी आत्महत्या केली.
कॅन्सर आणि आर्थिक चणचण

जेट एअरवेजच्या कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, शैलेश सिंग हे आर्थिक चणचणीला तोंड देत होते. जानेवारी महिन्यापासून जेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे शैलेश सिंग यांना नैराश्य आलं होतं.
शैलेश सिंग यांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांना किमोथेरपी करावी लागत होती. त्यातच आर्थिक चणचणीमुळे त्यांना नैराश्य आलं होतं.
कर्जबाजारीमुळे जेट एअरलाइन काही दिवसांपासून बंद आहे. या आर्थिक संकटात आत्महत्येची ही दुर्दैवी घटना घडली आहे. शैलेश सिंग यांचा मुलगाही जेट एअरलाइनमध्येच काम करतो, अशी माहिती या जेट एअरवेज कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.
शैलेश सिंग यांच्यामागे त्यांची पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे. शैलेश सिंग यांच्या मृत्यूनंतर अपघाती निधनाची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
थकलेले पगार
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार मिळायला अजून उशीर लागणार आहे. बँकांकडून अर्थपुरवठा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असं जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटलं आहे. जेटच्या व्यवस्थापनाने बँकांकडून अर्थपुरवठा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य न झाल्यामुळे पगार देणं लांबणीवर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजचे पायलट, इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन विभागातले अधिकारी असे मिळून 16 हजार कर्मचारी आहेत. या सगळ्यांचे पगार जानेवारी महिन्यापासून थकले आहेत.
जेटची विमानं जमिनीवरच
एकेकाळी भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची अत्यंत हलाखीची स्थिती झाली आहे. गेल्या आठवड्यात जेट एअरवेजने आपल्या सगळ्या विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थपुरवठा करण्यास नकार दिल्याने या एअरलाइन कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours