नवी दिल्ली, 27 मे: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने 542 लोकप्रतिनिधींची निवड केली. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR)ने दिलेल्या माहितीनुसार नव्या लोकसभेत 475 खासदार करोडपती आहेत. ADRने 539 खासदारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारी ही माहिती दिली आहे. ADRनुसार 542पैकी तिघा खासदारांचे प्रतिज्ञापत्र मिळाले नाही. यापैकी दोन खासदार भाजपचे तर एक काँग्रेसचा आहे. 17 व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 303 जागा तर काँग्रेसने 52 जागांवर विजय मिळवला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 543 पैकी 542 मतदारसंघात मतदान घेण्यात आले होते. तर तामिळनाडू येथील वेल्लोर येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने वेल्लोरमधील निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

भाजपच्या 301 खासदारांपैकी 265 खासदारांच्या प्रतिज्ञापत्राचा ADRने पडताळणी केली. त्यापैकी 265 म्हणजेच 88 टक्के खासदार करोडपती आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व म्हणजे 18 खासदार करोडपती आहेत. काँग्रेसच्या 51 पैकी 43 म्हणजेच 96 टक्के खासदार करोडपती आहेत. याशिवाय डीएमकेचे 23 पैकी 22, तृणमूलचे 22 पैकी 20 आणि वाएसआर काँग्रेसचे 22 पैकी 19 खासदारांची संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक आहे.

ADRने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक श्रीमंत खासदारांमध्ये पहिले तिन्ही खासदार काँग्रेसचे आहेत. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथून विजय मिळवणारे नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र असलेल्या नकुलनाथ यांची एकूण संपत्ती 660 कोटी इतकी आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला केवळ छिंदवाडा या एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी मतदारसंघातील खासदार वसंत कुमार यांचा क्रमांक लागतो. कुमार यांची संपत्ती 417 कोटी इतकी आहे. तर कर्नाटकमधील बेंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के.सुरेश यांची संपत्ती 338 कोटी इतकी आहे.

लोकसभा निवडूण केलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 20.93 कोटी इतकी आहे. तर सभागृहातील 266 खासदार असे आहेत ज्यांची संपत्ती 5 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. 2009च्या लोकसभेत 315 खासदार करोडपती होते. 2014मध्ये ही संख्या 443वर पोहोचली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours