मुंबई, 5 मे : बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिल्ली इथं शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सोशल मीडियात या मुद्द्यावरून मोठी चर्चाही झाली. पण याबाबत आता खुद्द आनंदराज आंबेडकर यांनी खुलासा केला आहे.
माझ्या काँग्रेस प्रवेशाची बातमी निव्वळ 'फेक न्यूज'चा भाग असल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 'आंबेडकर चळवळ मजबूत होत असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळेच या चळवळीत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अशा खोट्या बातम्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे,' असं म्हणत आनंदराज आंबेडकरांनी काँग्रेसप्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या आहेत.
आंबेडकर चळवळीत दरी निर्माण करण्यासाठी फेक न्यूजचा वापर करणाऱ्यांची कीव येत असल्याची टीकादेखील यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours