मुंबई, 19 मे- लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अर्थातच अखेरच्या टप्प्यात आज रविवारी मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून शेवटच्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघातही मतदान होणार आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी 13), पश्चिम बंगाल (9), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (तीन) आणि चंडीगडमधील एक जागेसाठी मतदान होणार आहे. पणजी (गोवा) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
वाराणसीमध्ये भाजप उमेदवार नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस उमेदवार अजय राय, महाआघाडीच्या उमेदवार शालिनी यादव अशी तिरंगी लढत आहे. बिहारमध्ये रविशंकर प्रसाद, रामकृपाल यादव, आर. के सिंह आणि अश्विनी कुमार चौबे यांच्यासह 157 उमेदवारांचं भवितव्य जनता ठरवणार आहे.
मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सुखबीरसिंग बादल, सुनील जाखड, भगवंतसिंग मान, हरसिमरत कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी, बॉलीवूड अभिनेता सनी देओल, मनीष तिवारी, प्रणीत कौर, किरण खेर, पवनकुमार बन्सल, हरमोहन धवन आदी नेते पंजाबमध्ये रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह सनोज सिन्हा, अभिनेते रविकिशन यांच्यासह सपा आणि बसपाच्या आठ नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याबरोबर पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात 6 उमेदवार असून मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. यासाठी 30 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. यासाठी 22 हजार 419 मतदार या मतदारसंघात आपला मतदानाच्या हक्क बजावतील. यापैकी 10 हजार 673 पुरुष तर 11 हजार 746  महिला मतदार या मतदारसंघात आहेत. मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीआरपी, केंद्रीय राखीव दल आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours