सोलापूर, 9 मे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधीच पंतप्रधानपदी कोण बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे, याबाबत भाष्य केलं आहे.
'भाजपला स्वत:च्या जोरावर बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. देशात भाजपशिवाय अन्य पक्षाचा पंतप्रधान व्हावा, अशी आमची इच्छा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसपेक्षाही थर्ड फ्रंटचा पंतप्रधान व्हावा, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही मायावतींना पाठिंबा द्यायला तयार आहोत,' अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.
'शरद पवारांना कदापि पाठिंबा नाही'
काँग्रेस आणि भाजपशिवाय तिसऱ्या आघाडीतून शरद पवारांचं नाव पुढे आल्यास तुम्ही पाठिंबा देणार का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, 'शरद पवारांना आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही तर विरोधच करू.'
'पवारांना पंतप्रधानपदासाठी लायक मानत नाही'


प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच पंतप्रधानपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. 'शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत,' असं विधान आंबेडकरांनी केलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours