मुंबई, 1 जून : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला पक्षातील सर्व मोठे नेते तसंच लोकसभा निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार हजर राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर विधानसभा निवडणुकांत कामगिरी सुधारण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं अपयश आलं. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखायची ठरवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपण दूर करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत नेमके काय बदल होतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा रंगत होती. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours